रॉयल सातारा न्युज* $
~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: देसाई
सभेस रामदास आठवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा दिनांक 29 एप्रिल रोजी सैदापूर ता. कराड येथील
एग्रीकल्चर कॉलेज ग्राउंड वर होणार आहे. यासाठी किमान एक लाख कार्यकर्ते जमणार आहेत. पंतप्रधान मोदी यांचे महाराष्ट्रावर असलेले लक्ष, साताऱ्यावर असणारे प्रेम आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याशी असणारे वैयक्तिक संबंध यामुळे या सभेत उदयनराजे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होणार अशी खात्री आम्हाला आहे. असा ठाम विश्वास सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या सर्व मित्र पक्षांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर आरपीआय पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले हे देखील या विराट सभेस उपस्थित राहून मतदारांना मार्गदर्शन करतील असे सांगितले.
पत्रकार परिषदेस आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार महेश शिंदे, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीनकाका पाटील, अतुलबाबा भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, आर पी आय चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, शिवसेना शिंदे गटाचे नेते पुरुषोत्तम जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे सातारा जिल्हा अध्यक्ष अमित कदम, माजी आमदार कांताताई नलावडे, मनोजदादा घोरपडे, भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र महिला संघटक चित्रलेखा माने कदम, भाजप सातारा अध्यक्ष सुरभीताई भोसले, दलित महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे, सचिन नलावडे ,युवराज कांबळे तसेच भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट , राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गट याचे पदाधिकारी पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना शंभूराज देसाई पुढे म्हणाले ,जिल्ह्यातील चारही आमदार ,सर्व नेते, पदाधिकारी, माजी आमदार झटून कामाला लागले आहेत. मी स्वतः माझ्या मतदारसंघात 11 जाहीर सभा घेणार आहे. तसेच गाठीभेटी ,मेळावे यांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व सहा मतदारसंघात सर्वच नेते ताकतीने कामाला लागले आहेत. महायुतीमध्ये असणाऱ्या चार आमदारांनी तर अंग मोडून काम करण्यास प्रारंभ केला आहे.स्वत:च्या निवडणुकीस ज्या पध्दतीने काम केले जाते तसे काम केले जात आहे.सहाजिकच सैदापूर तालुका कराड येथे होणारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पश्चिम महाराष्ट्रातली रेकॉर्ड ब्रेक सभा असेल. ही सभाच खासदार उदयनराजे भोसले यांच्या विजयावर शिक्का मोर्तब करेल.
विविध प्रश्नांना उत्तर देत असताना पालकमंत्री शंभूराजे देसाई म्हणाले ,पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातारच्या गादीला नेहमीच सन्मान देतात. त्यामुळे या निवडणुकीत उदयनराजे यांना प्रचंड बहुमताने विजयी करणे यासाठी नियोजन झाले असून त्याच्या कार्यवाहीस प्रारंभ झाला आहे.
आ. मकरंद पाटील यांच्याबाबत पत्रकार प्रश्न उपस्थित करतात मात्र मकरंद पाटील पूर्ण ताकतीनिशी कामाला लागले आहेत. महाबळेश्वर ,वाई, खंडाळा येथे त्यांचे कार्यकर्ते खासदार उदयनराजे भोसले यांचे काम करत असून वाई येथे महाराजांना नक्कीच दमदार मताधिक्य मिळेल. महाराजांचा उमेदवारी अर्ज भरताना वाई येथील सर्वाधिक गाड्यातून कार्यकर्ते आले होते. त्याचबरोबर येथील कार्यकर्ते उत्साहाने त्यात सहभागी झाले आहेत. माजी आमदार मदनदादा भोसले यांचा संपर्कही जोरदार सुरू आहे. त्यामुळे वाई येथे आम्हाला मताधिक्य मिळणार यात शंका नाही .
रविराज आणि यशराज देसाई गावोगावच्या बैठकांच्यावर भर देणार आहेत असेही देसाई म्हणाले.
यावेळी पाटण,कराड चे दोन्ही मतदार संघ महाराजांना सर्वाधिक मताधिक्य असा विश्वास व्यक्त केला.याचे कारण सांगताना ते म्हनाले ,धैर्यशील कदम,मनोजदादा घोरपडे आणि अतुलबाबा भोसले यांचा झंझावाती प्रचार सुरू आहे.अतुल भोसले यांनी तर मोदी यांच्या सभेसाठी जातीने लक्ष घातले आहे. असेही देसाई म्हणाले.
दरम्यान, सातारा लोकसभेचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत मनोगत व्यक्त केले. तसेच कोणाचेही नाव न घेता विरोधकांवर तिखट शब्दात निशाणा साधला.
खा.उदयनराजे म्हणाले , विरोधकांना जिल्ह्यामध्ये चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व उमेदवार म्हणून मिळू नये हे विरोधकांचे दुर्दैव, शोकांतिका आहे. घोटाळे करणारे भ्रष्टाचारी, माथाडी ,कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या पैशाचा अपहर करणारे उमेदवार सातारकरां समोर उभे केले आहेत. लोकशाहीच्या न्यायालयात त्यांना नक्कीच शिक्षा होईल. आमचा कोणाला वैयक्तिक विरोध असण्याचे कारण नाही, मात्र भ्रष्ट विचाराला आम्ही विरोध करणारच. आम्ही गप्प बसलो तर, त्यांच्या भ्रष्टाचाराबाबत कोणी बोलणार नाही. म्हणून आमदार महेश शिंदे यांनी त्यांच्या भ्रष्टाचाराबाबत आवाज उठवला .त्यांनी उठवलेला आवाज योग्यच आहे. खरे तर आम्ही तुमच्या विश्वासावर निवडून येतो .तुमच्या त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही, हे नक्की आहे. सहा विधानसभा मतदारसंघात चार आमदार हे महायुतीचे आहेत.
विरोधक मागच्या निवडणुकीची तुलना आजच्या परिस्थितीशी करत आहेत. मात्र आता परिस्थिती बदललेली आहे. वेगळी आहे. यापुढे विधानसभेच्या निवडणुकीत वाटेल त्या परिस्थितीत सातारा जिल्ह्याला महायुतीचे सहा आमदार पाहायला मिळतील असा ठाम निर्धार करतो. विश्वास मी देतो. असे खासदार उदयनराजे भोसले म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्रंदिवस विकासासाठी झटत आहेत. आम्हा सगळ्यांमध्ये एक वाक्यता आहे. विकासाचा विचार आहे. या उलट विरोधी पक्षाकडे विस्कळीतपणा आणि स्वार्थ एवढेच दिसून येतो. आम्ही सर्व एका विचाराने एकत्र येत आहोत .एकत्र राहिलो आहोत. आमचे उद्दिष्ट एक आहे. आमचा विचार विकासाचा आहे. त्यामुळे आम्ही केवळ घोषणा देत नाही तर प्रत्यक्ष काम करून दाखवतो.यासाठी मला सहा विधानसभा मतदारसंघातून भक्कम पाठिंबा आहे.
असे सांगून खासदार उदयनराजे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या घटने संदर्भात मार्मिक टिपणी केली.
गोरगरिबांची मुले शिकावीत शिक्षणापासून वंचित राहू नयेत ,त्यांनी प्रगतीची भरारी मारावी या उद्देशाने कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली. मात्र या शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी तयार केलेली घटनाच सध्याच्या संचालकांनी बदलली. राज्याचा मुख्यमंत्री रयत शिक्षण संस्थेचा पदसिद्ध अध्यक्ष असावा. त्यामुळे या शिक्षण संस्थेला मदत व्हावी. ही मदत गरीब मुलांच्या शिक्षणासाठी व्हावी असा विचार कर्मवीर भाऊराव पाटलांचा होता. मात्र यांनी घटना स्वतःच बदलली आणि स्वतःलाच तहहयात अध्यक्ष करून घेतले. यामध्ये लोककल्याण, गोरगरिबांसाठी काम करणे हा यशवंत विचार संपवून टाकला. खरे तर रयत शिक्षण संस्था स्थापन करण्यात आमच्या घराण्याचे महत्वाचे योगदान आहे. त्याचा मला अभिमान आहे. मात्र सध्या सुरू असलेला हा प्रकार यशवंत विचारांना तिलांजली देणाराच आहे.
-----------------------------चौकट
मी माझ्या विचारांवर ठाम: महेश शिंदे
कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी, शरद पवार यांनी यशवंत विचार सांगू नयेत हा त्यांचा विचार पुन्हा एकदा अधोरेखित केला. त्याचे कारण सांगताना ते म्हणाले,मी माझ्या विचारांवर ठाम आहे.कारण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांचे विचार त्यांचे कर्तृत्व आणि आत्ता दिलेला उमेदवार त्याचे कर्तृत्व हे पूर्णपणे भिन्न आहेत.एकमेका विरोधी आहेत.अशा घोटाळेबाजांना यशवंतराव चव्हाण साहेबांनी कधीच उभे केले नसते. त्यामुळे शरद पवार यांनी यशवंत विचारांची महती सांगू नये असे आमदार महेश शिंदे म्हणाले.
---------------
यावेळी नितीन काका यांनी, आमच्यात कोणतीच नाराजी नाही असे स्पष्ट केले. वाई येथे खासदार उदयनराजे भोसले यांचे काम जोरात सुरू असून, त्यांना आम्ही मताधिक्य देणार असे स्पष्ट केले. प्रारंभी पंचवीस वर्षापासून अस्तित्वात असणाऱ्या घड्याळा चिन्हाला उमेदवारी मिळावी असा आमचा आग्रह होता. विचार होता. मात्र कालांतराने वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाल्यावर खासदार उदयनराजे भोसले यांचे नेतृत्व मान्य करण्याचे ठरले. आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्या चे वाईकरांनी ठरवले. नाराजी नव्हती आणि नसेल असे ते म्हणाले.